स्वरांजली – कंबोडिया स्टाइल
माझ्या समोर ‘अप्सरा
नृत्य ‘ सुरू होतं. सोबतच ख्मेर खाद्य पद्धतीचे
व्यंजन सजवून ठेवलेले होते. रात्रीच्या जेवणासोबत नृत्याविष्कार पाहण्याचा योग
बहुधा पहिल्यांदाच आला असेल. समोर मंचावर कलाकार मुली आपल्या देशातील कलेचा एक
सुंदर प्रदर्शन इतर देशातून आलेल्या पर्यटकांसमोर करत होत्या.
सकाळीच विमानाचा प्रवास करून आम्ही सर्व सीम रीप ला उतरलो. संध्याकाळचा
कार्यक्रम जेवणासोबत नृत्याचा आनंद घेण आधीच ठरलेलं होतं. खास कंबोडियातील आतिथ्य
आणि संस्कृती पाहण्याचा योग इथे आला. इथे जेवत असताना अप्सरा नृत्य पाहता येतो.
अंदाजे दोन तासाचा कार्यक्रम असतो. जेवण ख्मेर खाद्य संस्कृतीला अनुसरून बुफे सामिष
पद्धतीचं होतं. जेवण सर्वांसाठी नवीन
असल्याने सॅलड, वेज सूप, फळं, टोफू सोबतच फिशचे पदार्थ याची चव घेतली.
अप्सरा नृत्या मधल्या मुलींच्या हालचाली तश्या नाजुकच होत्या.
डोक्यावर असा मोठा मुकुट आणि त्याला साजेशीर रंगीत वस्त्र घालुन या मुली अस हाताची, मानेची, कमरेची आणि पायांची नाजुक
हालचाली करत होत्या. स्टेज वर एका बाजूला गाणारी आणि खास स्थानिक वाद्य वाजवणारी
मंडळी बसलेली होती. अप्सरा नृत्यानंतर काही लोककथा, काही शेती बद्दल, काही पिक कापणीच्या वेळेसची गाणी आणि त्यावर मुलं आणि मुलींनी
नृत्य केल.
गाण्यांची चाल आणि शब्द यावर मला भाष्य करता येणार नाही. पण
आपल्या देशाची लोक आणि खाद्य संस्कृतीचा पर्यटकांना देण्याचा हा सुखद अनुभव नक्कीच
वाखाणण्याजोगा वाटला. खास ख्मेर संगीत वाद्यांबद्दल म्हणायचं झालं तर त्यांचा
आपल्या भारतीय संगीतवाद्यांचेच जवळचे नातेवाईक. एक आपल्या बासरी सारखा, एक
सनई सारखा, एक आपल्या नगाड्या सारखा, एक तर
बिलकुल आपल्या संतूर सारखा, छोटीशी झांझ, एक
जलतरंग सारखाच होतं पण इथे भांडी छोट्याश्या अर्ध गोलाकार आकारात होत्या, एक कलाकार छोटासा स्थानिक ढोल हातांनी वाजवताना
दिसला, एक तर जायलोफोन सारखाच होता.
पूर्वेकडील देशांमधल संगीत मी चित्रफीतींच्या माध्यमातून कधी
कधी पाहतो. ऐकायला थोड्या वेगळ्या सुराची-चालीची वाटतात. वाद्यांची रचना सुद्धा
वेगळी आहे. म्हणून ऐकायला वेगळी वाटणारच. आपल्याला
‘लव इन टोकयो’ सिनेमातील ‘सायोनारा’
गाण्यात वाजलेले वाद्य आठवतात ना ?
मला टूर मॅनेजर म्हणून काम करताना खूप दिवस नाही झालेत. पण, प्रत्येक ग्रुप मध्ये सुरवातीला अनोळखी असणारी लोकं टूर
संपल्यावर माझ्याशी अजूनही व्हाटसप्प वर संपर्क ठेऊन आहेत. काहींसोबत अगदी
जिव्हाळ्याचे संबध बनलेत. एक टूर प्रबंधक म्हणून माझ्या व्यक्तिमत्वात बदल आणि
सुधार आणण्यामध्ये या सर्वांचा महत्वाचा वाटा आहे. आतापर्यंत वेग वेगळ्या ग्रुप
सोबत थायलंड मलेशिया सिंगापुर अनेक वार्या झाल्या, दुबई वारी सुद्धा झाली.
पुण्यातले श्री चारूहास कुलकर्णी आणि यांचा मित्रवर्ग असे
एकूण पंधरा जणांचा समूह नागपुरातील पेगासस हॉलिडेज मधल्या एरिका कार आणि सौ.वसुधा
कुलकर्णी यांच्या संपर्कात होता. यांची कंबोडिया मध्ये सीम रीप जायची प्रवास योजना
बनलेली होती. इथे जाण्यागोदर सर्वांनीच
पुस्तकं वाचून चांगलाच अभ्यास केला होता.
इथे कंबोडियातील संगीत वाद्यांशी तोंडओळख ‘अप्सरा’ नृत्यामुळे झाली. पण या पुढचे चारही दिवस ही वाद्ये माझ्या सोबत इतरांच्या समोर सतत येतील आणि आपल्या सुरांचा असर सर्वांच्या मनावर कायमचा कोरतील अशी अपेक्षा नव्हती. सीम रीप ला येणाच्या मुख्य उद्दिष्ट्य होतं अंगकोर मंदिरांचा समूह पाहायचा आणि त्यांचे सुंदर फोटो आपल्या कॅमेर्यात बंधीस्त करायचे. त्यात अति महत्वाचा भाग म्हणजे भारताबाहेर जगातल सर्वात मोठा हिंदू मंदिर अंगकोर वाट पाहणे. पूर्वीचा कंबोज देश, पॉलपॉटच्या काळातला ‘कंपूचीया’ याचा इतिहास आणि इथल्या संस्कृती सोबत आधुनिक कंबोडिया देशाची वाटचाल जाणून घेणे.
पहिल्या मंदिरात – बांते सामरे मध्ये जातांना करताना पुन्हा
याच संगीत वाद्यांचा सूर ऐकू आला. जस जस समोर गेलो तस लक्षात आल की काही माणसं
मंदिराकडे जाणार्या रस्त्याच्या एका बाजूला बसून हे वाद्ये वाजवताय. काय माहिती
पण मला तू सूर थोडासा मन हेलावणारा वाटला. जवळ गेल्यावर मी स्तब्ध झालो. काही
माणसांचे पाय नव्हते, एकाचा हात नव्हता, एकाला
डोळे नव्हते ....पण सर्वजण मी वर नमूद केलेली
संगीतवाद्य वाजवत होते.
बाजूला एक फलक लागला होता, त्यात इंग्रजीत लिहीलेल्या
भाषेतून कळलं की हे सर्व भुसुरुंग ग्रस्त स्थानिक लोक आहेत. त्यांच्या समोर एक मोठ
भांड ठेवलेल होत ज्यात पर्यटक पैसे टाकत होते. मन एकदम गहिवरून आलं. मी इथे
यायच्या अगोदर इथला इतिहास वाचला होता. ख्मेररूषच्या काळात इथे खूप कत्लेआम झाला
असं ठाऊक होतच. हा पहिला संगीतमय बोलका पुरावा मी समोर पाहात होतो. बाजूच्या
व्हिएतनाम देशात अमेरिकेसोबत होत असलेल्या युद्धाचा असर कंबोडिया वर झाला. त्याच
काळात कित्येक नागरिक मारले गेले. पोल्पोट च्या खेमर रूषचा चार वर्षाचा
(1975-1979) काळ या देशाचा एक रक्तरंजित इतिहास म्हणून पूर्ण विश्वाला माहीत आहे.
या काळात युद्धं होत असतांना देशभरात ख्मेररूषच्या सैनिकांनी
जागो जागी भुसुरुंग पेरले. त्यात खूप नागरिक मारले गेले. या भुसुरुंगांमुळे काहींचे हात गेले, पाय
गेले, डोळे गेले…. बरीच लहान मुळे त्यावेळेस याच्या तावडीत आली.
ही वाद्ये वाजवत असताना जो सूर निघाला तो मनाला प्रसन्न करणांरा निश्चितच नव्हता. मना मध्ये बेचैनी वाढवणारे एकूण भाव होते. माहिती काढल्यावर अस कळलं की ही लोकं आज कंबोडिया देशातील लोकगीतांचे प्रतींनिधी आहेत. जो दुर्दैवी काळ त्यांनी अनुभवला तो सुरांच्या माध्यमातून आपल्या देशातील बंधु-भगिनी आणि इतर पर्यटकांपर्यंत ते पोचवताएत. यातुन होणार्या थोड्याफार उत्पन्नावर त्यांची घरे चालतात.
अजून एक हृदयाला भिडणारी गोष्ट अशी, ही
भुसुरुंग अजूनही जमिनीत बर्याच ठिकाणी आहेत आणि आजही त्यामुळे एकतर लोकांचे जीव
जातात नाहीतर लोकं अपंग- आंधळी होतात. अंगकोर मंदिर पाहायला येणार्या
आंतर्राष्ट्रीय पर्यटकांची संख्या पाहता या सर्व लोकांसाठी हा एक रोजगार म्हणून
कामाचा आहे. दिवसाचे अंदाजे चारशे ते सहाशे रुपये मिळतात. यांच्या पैकी काही
पर्यटकांना ही लोकं वाद्य वाजवण्याच प्रशिक्षण सुद्धा देतात.
पुढचे चारही दिवस ज्या ज्या मंदिरामध्ये गेलो तिथल्या मुख्य
दारापाशी असे पाच -सहा लोकांचे समूह बसून या
वाद्यांमधून सुरांची जादू पसरवताना आढळली. आपण आत मंदिर फिरताना कानावर हे
सुर पडत असतात. अंगकोर वाट, अंगकोर थोम, ता
फ्रोम, बांते कदै, ता सोम, बांते
श्री…..कुठल्याही मंदिरात जाल हे सुर तुमच्या सोबतच असतात.
फक्त एकाच ठिकाण जिथे मला या वाद्यांचा सुर तिथल्या
वातावरणात एकरूप होतांना दिसल. अशी जागा होती नीक पीन. या जागेकडे जातांना तुमची
गाठ आधी या सगीत वादकांसोबत होते मग तुम्ही पाण्यावर बांधलेल्या लाकडीच्या
पायवाटेवरून जात चार-पाच लहान कुंड असलेल्या जागेवर पोहोचता. या ठिकाणी चारही
बाजूला छान हिरवीगार झाडे होती. त्या वेळेस लांब कुठून तरी येणारे सुर माझ्या कानावर पडत होते . माझ्या द्रुष्टीने हाच एक
दैवी अनुभव होता.
या भुसुरुंगला शोधून त्याला निकामी करणार्या अकीरा बद्दल माहिती मिळाली. या व्यक्तिच लहानपण ख्मेररूष मध्ये बाल-सैनिक म्हणून गेल. नंतरच्या काळात हीच व्यक्ति या सर्व भुसुरुंग शोधून त्याला निकामी करण्यामागे लागली. या सर्व निकामी भुसुरुंग एका जागी आणून ठेवले आणि त्याच वास्तुसंग्रहालय बनवलं. त्यात त्याला तिथल्या शासनाची आणि विदेशातील संस्थांची मदद मिळाली. इथून होणार्या उत्पन्नातून त्याच परिसरातील अनाथ मुलांचं संगोपन होतय. आजही अकिरा भुसुरुंग शोधण्यामागे आणि त्याला निकामी करण्यात मग्न आहे.
कंबोडियात शासनाने या भुसुरुंग ग्रस्त लोकांना आधार म्हणून मंदिर बाहेर जागा दिल्या आहेतच सोबत सीम रीप शहरात बाजारात सुद्धा त्यांना जागा
दिलेली आहे. हा प्रयत्न निशितपणे
वाखाणण्या सारखा आहे.
चार दिवसाच्या सीमरीप मधल्या वास्तव्यात तिथल्या स्थानिक लोकांसोबत
भेटी झाल्या. मंदिर बघितली,बाजार फिरलो, संग्रहालय
पाहिले, ख्मेर कला कुसर जवळून पाहू शक्लो, ख्मेर खाद्य
संस्कृती बद्दल जाणून घेतलं. एकूण जागेचा महत्व पाहता इथली लोक आपल्या देशाचा
इतिहास जाणून पर्यटकांना व्यवस्थित माहिती
देतांना दिसतात.
पण काहीही म्हणा, चार दिवसात अनुभवलेली - ऐकलेली
इथली संगीत वाद्ये आणि त्याच्या साहाय्याने लोकगीत समोर आणणारे या आत्मभिमानी आणि प्रेमळ
लोकांना माझा सलाम. ते सुर अजूनही माझ्या कानात वाजतात.
नवीन देश पाहणे सोबत नवा अनुभव घेणे हा माझा आवडीचा छंद. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ज्यांच्या सोबत मला जाता
आलं, ही सर्व मंडळी एकदम मनमिळाऊ स्वभावाची होती. सगळेच छान
मराठी बोलणारे असल्यामुळे मला एरिका मॅडमनि
यांच्या सोबत मराठी टूर मॅनेजर म्हणून जाण्याचा सल्ला दिला. ही एक चांगली
संधि होती यात काही शंकाच नाही आणि त्याकरिता पेगासस हॉलिडेजचे मनापासून आभार.
अमित नासेरी
9422145190
Comments
Post a Comment