फ्नॉम पेन्ह - फिनिक्सपेक्षा कमी नाही !!!

 

आपण कधी एकाच ठिकाणी एकाच वेळी आनंद आणि अस्वस्थपणा अनुभवला आहे का?


कंबोडियाची राजधानी फ्नॉम पेन्ह मध्ये आपणास या प्रकारचा अनुभव मिळेल !!!!

टोनले सॅप आणि मेकाँग नद्यांच्या संगमावर वसलेले हे सुंदर शहर एकेकाळी तिच्या मोक्याच्या जागेमुळे  एक महत्त्वपूर्ण व्यापार केंद्र होते.

इतिहासाच्या पांनांमधून डोकावताना, अंगकोरमधील खमेर प्रशासन शेजारच्या आयुथायामध्ये असलेल्या शत्रूंच्या सतत स्वारीने अस्वस्थ होते. व्यापारातील वाढ लक्षात घेऊन अंगकोर भौगोलिकदृष्ट्या फार प्रभावी सिद्ध होत नव्हते. आपली नवीन राजधानी म्हणून देशाच्या मध्यभागी असलेल्या या संगमाची जागा चीन, इंडोनेशियासारख्या देशांशी भविष्यातील व्यापारासाठी चांगली राहील. असं लक्षात घेता पंधराव्या शतकात ख्मेर इथे स्थायिक झाले. परंतु यामुळे अंगकोरमधील सर्व मंदिरे पूर्णपणे विसरली गेली.

सोळाव्या शतकात हा देश फ्रान्सच्या संरक्षणाखाली आला. एकोणीसाव्या शतकात हेनरी मौहोट मुळे एंगकोर चा पुन्हा शोध लागला. १९५३ मध्ये फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळविल्यानंतरही अमेरिका-व्हिएतनाम युद्धाचा प्रतिकूल परिणाम कंबोडियावर झाला. गेल्या शतकाच्या अखेरीस संयुक्त राष्ट्रांच्या नजरेत काही प्रमाणात शांतता आहे.


आज 
फ्नोम पेन्ह हे एक आधुनिक शहर आहे. येथील स्वातंत्र्य स्मारक, राष्ट्रीय संग्रहालय, रशियन बाजारराजवाडा आणि त्याला लागूनच 'व्हाइट पागोडा' पहाण्याचा एक चांगला अनुभव सर्वांना येतो. देशभरातून उत्खनन केलेल्या अंगकोर ख्मेरच्या कारकिर्दीत पुतळे व अवशेष राष्ट्रीय संग्रहालयात खूप चांगले संरक्षित आहेत. इतिहासामध्ये रस असणार्‍या प्रत्येकासाठी सीम रीपच्या संग्रहालयानंतर या संग्रहालयात ही शिल्पे पाहणे एक सुखद अनुभव आहे.




राष्ट्रीय संग्रहालयात भेट देताना, आपणास ख्मेर साम्राज्य काळाच्या प्रचलित कलेवरचा भारतीय परिणाम लक्षात येतो. येथे आपण शेष शाही विष्णू, गणपती, गौतम बुद्ध यांचे पुतळे पाहून थक्क व्हाल.  'व्हाइट पॅगोडा' मंदिर परिसराच्या भिंतींवर रामायण कथेचा 'म्युरल' स्वरूपात चित्रीकरण सर्वांच लक्ष वेधून घेतं.



आपण 'टूल सूंग जीनोसाइड' संग्रहालय आणि 'चोएंग एक किलिंग फील्ड' ल जेव्हां भेट देता तेव्हा आपण विचलित आणि अस्वस्थ होता. या दोन्ही ठिकाणी आपली भेट देणं आवश्यक आहे. ही ठिकाणं पोल पोटच्या क्रूर शासनाची साक्ष देतात. १९७५ -१९७९ काळात हजारो लोकांचा बळी घेतला गेला. एकेकाळी ही शाळा असायची, परंतु ख्मेर रुशने ते तुरूंग बनवून मुले, वृद्ध, तरुण, पुरुष किंवा स्त्रिया अशा लोकांना तुरूंगात टाकले आणि त्यांचे अमानवीय छळ केले. नंतर शहराबाहेर ७-८ किमी नेऊन त्यांची  हत्या करुन तेथेच पुरण्यात आले. अगदी कोणीही यांच्या तावडीतून सुटलेलं नव्हतं.


शहराबाहेरील या जागेला 'चोयॉंग एक किलिंग फील्ड' म्हणून ओळखले जाते. या संकुलामध्ये स्मारक / स्तूप आहे ज्यामध्ये मृतांचे अवशेष आहेत. येथे, त्या रक्तरंजित इतिहासाबद्दलची माहिती गॅलरीमधील चित्रांद्वारे मिळविली जाऊ शकते. एक लघु फिल्म सुद्धा दाखवली जाते. आज तुम्ही जेव्हां इथे चालता तेव्हां हृदय थरथर कापत आहे असं वाटतं. आपण जेव्हा फ्नॉम पेन्हला येता तेव्हा येथे भेट देणे महत्वाचे आहे.



अंगकोरची अनेक मंदिरे आणि पुतळे याला बळी पडले. बरीच उद्ध्वस्त झाली आणि जी वाचली त्यांना आज संग्रहालयात ठेवलेलं आहे.

मी यापूर्वी सीम रीप बद्दल माहिती देताना तिथल्या भुसुरुंगातून वाचलेल्या लोकांबद्दल सांगितले होते. आज, 'टूल सूंग जिनोसेद' संग्रहालयाची माहिती देताना, त्याच तुरूंगात शिक्षा भोगलेल्या आणि छळ सहन करून जिवंत राहिलेल्या लोकांच्या तोंडून तुम्ही त्या काळातील गोष्टी ऐकता.


कंबोडियाच्या नवीन आणि जुन्या पिढीच्या माहितीत या घटना महत्त्वाच्या आहेत आणि आज इतक्या वर्षांनंतरही कोणीही ते विसरणार नाही. जगभरातून कोट्यावधी पर्यटक अंगकोर वारसा पाहण्यासाठी येतात आणि सोबतच फ्नोम पेन्ह इथे टोनले सेप - मेकाँग  नदीतल्या बोटीच्या सफरीचा आनंद घेतात.

आज, कंबोडिया देश आणि  राजधानी फ्नोम पेन्ह अश्या प्रतिकूल परिस्थितीत विजय मिळवून संपूर्ण जगासमोर एक आदर्श उदाहरण सादर करीत आहे.....एका फीनिक्स सारखं !!!

 

 

अमित नासेरी

9422145190

Comments

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

Camp Cherry Farm, Ramtek - Part 1

The Motorhomes, Caravans, Vanity Van – What is the difference?