एक ‘विचित्र’ संभाषण !!!


एक विचित्र संभाषण !!!

सध्या किचन मध्ये माझी लुडबूड लॉक डाउन काळात वाढलीय. स्वयंपाकात नव्हे तर साफ-सफाई मध्ये. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून एकूण रूटीन सुरू झालं. भांड्यांची आदळ आपट झाली, कुठलं भांड कुठे ठेवायचं, ताट खालच्या कप्प्यात, वाट्या पेले तिच्या वरच्या कप्प्यात, चमचे व त्यांचे नातेवाइक साइडच्या कप्प्यात वगैरे वगैरे सर्व सोपस्कार पार पाडून सात आठ दिवसात लिंक लागली. त्यात ओट्यावरचा गॅस व इतर साहित्याची देखरेख आलीच.

स्वयंपाकातला म्हटलं तर मी थोड्याफार पोळ्या करू शकतो. कूकर लाऊ शकतो,  अगदी चहा कॉफी सुद्धा जमते. अजून भाज्या, फोडणीच वरण आणि उसळ बनवण्यापर्यंत मजल मारायची आहे. सर्वात जास्त काळजी ओटा स्वच्छ ठेवायची घेतो. नाहीतर बायको कुरकुर करते.

जून महिना सुरू झालाय. आता पर्यन्त किचन मधल्या जवळपास सर्वच डबे, भांडी, मिक्सर, कुकर, फ्रीज, मायक्रोवेव मंडळी मला ओळखतात. मला कधी कधी असाही भास होतो की ते माझ्यासोबत बोलायचा प्रयत्न करतात. आहे न विचित्र गोष्ट ?

आता अगदी काल परवा दूध गरम करत असतांनाचा अनुभव. दूध वर याच्या अगोदरची स्थिति. अचानक दूध असा गुलूप आवाज करत वर आलं पण उतू नाही गेल.   मी अस होतांना आधी पण पाहिलय पण लक्षं नव्हतं दिल.

अस दोन तीनदा गुलूप गुलूप केल्यामुळे मी चांगलाच हबकलो. तर काय म्हणे की माझा मूड झाला की मी असच गुलूप’’ करतो तू टेंशन नको घेऊ. तू मला कोणत्या भांड्यात गरम करायला घेतो त्यावर माझा गुलूप अवलंबून आहे. मी सुद्धा महंट्ल तुझ्या अश्या विचित्र गुलूप मुळे माझी वाट लागेल. तू उतू गेलास तर बायको बोंबलेल. त्यामुळे शांत रहा.

बाजूच्या छोट्या शेल्फ वर दोन डबे हा प्रकार पाहत होते. त्यांचं आपसातल गॉसिप ऐकलं. तीन महिन्याच्या लॉक डाउन, त्यात याचा प्रवास-पर्यटनाचा धंदा बंद,  याची तशिपण वाट लागलीच आहे. काही काम नसताना या नालायकनी आमच्या डोक्यावर पोळ्या करताना तो गरम गरम सराटा ठेवला तेव्हां आमची किती वाट लागली याचा काही अंदाज ? कितीदा बायकोनी याला सांगितलं सराटा नको, चिमटा वापरायचा पण याला अक्कल नाही.

पलीकडचा पाण्याचा पिंप सुद्धा आता बोलू लागला. अरे हो तो पोळ्या बनवत असताना मी पाहिलय की ह्याची पोळी टुम्म फुगली का हा जाम खुश होतो आणि सराटा कुठेही ठेवतो. सकाळी ताज पाणी भरताना सुद्धा हा जुनी गाणी म्हणत असतो. याला आजकालची गाणी नाही माहिती. एकदमच बुजरूग आहे.

बाजूला तिवई वरच्या माठ म्हणे गेल्या तीन महिन्यापासून विविध भारती वर सकाळी भूले बिसरे गीत ऐकायचा पण आता रेडियो लावतच नाही. बुजरूग असेल तर काय मला पण जुनी गाणी आवडतात अस म्हणत पिंपाला त्यांनी गप्प केल.

आतल्या शेल्फ मधून वाट्यांची टन टन सुरू झाली. आम्हाला याची एक गम्मत कळली आहे सांगू का?  बाकी सर्वांना कुतुहल. त्यातली एक वाटी म्हणे की आम्ही कधी खाली  पडलो तर तो आवाज ऐकून याला खूप हसू येतं आणि मग याला कंट्रोल नाही रहात. मग याची बायको याला रागावते. म्हणून आजकाल आम्ही याचा हातातून मुद्दाम उड्या मारून खाली पडतो आणि मग आमच मनोरंजन सुरू होतं.

हे ऐकून पेले सुद्धा हसायला लागले. म्हणे बरोब्बर आम्ही सुद्धा हे पहिलं आहे. एक काम करूया॰ उद्या हा भांडी धुताना आपण एक मेकांना धक्का मारून खाली पडायच आणि मजा पहायची. सगळ्यांचं छान मनोरंजन होईल.

बाजूला  छोट्या माळ्यावर गंज पाहत होता पण काही बोलायच्या आत मायक्रोवेवनी आरोळी दिली. माझ्याकडे तर लक्षच नाही याच. पूर्वी अन्न गरम तरी करायचे पण जेव्हा पासून यांनी वाचल आहे की मला वापरताना किरणोत्सर्ग होतो आणि त्यामुळे मुळे धोका आहे माझा शो पीस झालाय.

डायनिंग टेबलावर असलेला पोळ्यांचा डबा म्हणे की माझे बरेचसे मित्र या समोरच्या अलमारीत बंद आहेत. कधी इथे पार्टी असलीच तर भेट होते. कणकीचा डबा हाय म्हणत बोंबलला. आठवड्यातून एकदा आमची पीठाची गिरणीत विजिट असते पण मला टेंशन येताना असतं कारण मी खूप गरम झालो असतो आणि एखाद वेळेस हा मला पाडेल याचीच मनात भीती असते.

एवढ्यात गॅसची शेगडी भुस्स भुस्स असा आवाज करू लागली. तिला वर लटकलेल्या तव्याने विचारलं काय झालं? ती म्हणे एक पाल फिरत आहे ओट्यावर. ती इथे माझ्याजवळ आली तर मी तिला असाच आवाज काढून पिटाळते.

हे ऐकून बाकी भांडी घाबरली  आणि पाल पाल ओरडत एक दूसर्‍याला धक्का मारायला लागली. या गडबडीत दोन तीन भांडी खाली पडली.  हा आवाज ऐकून माझी खाडकन झोप उडाली.

 उठून पाहतो तर बायको बाजूला दूध उतू गेल्यासारखा घाबरा घुबरा चेहरा करून बसलेली होती. मी विचारलं काय झालं? ती म्हणे कदाचित उंदीर आहे आणि त्यांनी भांडी पाडली वाटतं जरा पहालका ? घड्याळ पहिलं तर पहाटेचे साडे तीन वाजले होते. किचन मध्ये जाऊन पाहतो तर  गंज खाली पडलेला होता.

बास आज आपल्या झोपेची वाट लागली असं मनात म्हणत उंदीर शोधायला लागलो. एकदा बाकी सर्व भांड्याकडे निरखून पहिलं. सर्वच चुपचाप होती. 

आश्चर्य !!!

तो मै सपणा देख रहा था !!!

 

अमित नासेरी


Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park