वेबिनारायण नमः

वेबिनारायण नमः

कोविद19चा प्रसार थांबवण्या करिता सरकारी आदेश होता. त्यात काही महत्वाच्या बाबी होत्या गर्दी न करण्याचा, आपसात न भेटण्याचा, बाजारात न जाण्याचा वगैरे वगैरे. पण आपल्या भारतीय संस्कृतित आपण एक-दूसर्‍याला भेटल्याशिवाय राहुच शकत नाही. अश्यावेळेस इंटरनेट वरून सर्वांशी संपर्क ठेवण्याचे काही महत्वाचे एप्स अगदी देवासारखे धाऊन आले. याचा उपयोग सर्वांनी घरबसल्या संगणकावर आणि मोबाइल वर इतका केलाय की इट्स ए न्यू नॉर्मल !!!

लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षात लोकं आपसात न भेटता झूम, गूगल टीम, वेबेक्स, टेलिग्राम, एमएस मीट आणि इतर अश्याच वापरण्यास सोपे सॉफ्टवेअर मुळे संपर्कात होती. इथे घरी चांगल इंटरनेट असण्याची पहिली अट. सेल-मोबाइल वर याला डाऊनलोड करू शकल्याने जगभरातल्या लोकांच्या संवादाला एक वेगळीच दिशा मिळाली.

आपल्याला विडियो कॉलिंग/कॉन्फ्रेंसिंग काही नवीन नाही. पण, या एप्स मधल्या तंत्रज्ञानामुळे चार पावलं पुढे टाकत अधिकाधिक लोकांना सोबत घेऊन मीटिंग, ट्रेनिंग देण्याचं कल वाढल्याच दिसलं. सोबतच यांचा बॅकअप आपल्याला घेता येतो. भारतात असलेल्या जगभरातल्या संस्था आणि त्यातील कर्मचारी कुठलीही काळजी न करता या तंत्रज्ञानाचा फायदा घेत संपर्कात राहून कामं करत होती.  

नातेवाईकांना आपसातला हालहवाल यामुळेच कळला. कॉलेज मधल्या मित्र-मैत्रिणींचे समूह या मुळे अजून घट्ट झाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सेमेस्टर मधला उरलेला अभ्यास या ऑनलाइन वेबिनार एप्स मुळे मार्गी लागला. खाजगी क्लासेस घेणार्‍यांची सुरवातीस तारांबळ उडाली पण लगेच त्यांनी सुद्धा हाच मार्ग अवलंबला.

खाजगी व सरकारी संस्थांनातिल कर्मचारी काही कार्यालयात तर काही  घरी बसून काम करत होते. अधून मधून सकाळची मीटिंग घेण्यासाठी वेबिनार एप्सचा फारच उपयोग झाला. थोडक्यात जी मीटिंग कार्यालयात घेतली जायची तीच आता घरबसल्या लॅपटॉप किंवा मोबाइल वर तुम्ही घेऊ शकता आणि त्यात इतर सहकार्‍यांना सामील करू शकता.

 पण कार्यालयातली औपचारिकता आणि शिस्त इथे गायब झाली. कारण घरी असल्यामुळे अगदी शयनकक्षात, पलंगावर झोपलेल्या अवस्थेत, बंनियन पायजमा घालून, लोकं मीटिंग  मध्ये सामील होतांनाच स्क्रीन वर दिसून आलं. आपण काय घरीच आहोत या बेफिक्रीत,  अगदी चुकूनका होईना,  काही जणांनी तुमचं खाजगी आयुष्य त्या छोट्याश्या फ्रेम मधून बघितलं. याच कारण तुम्ही विडियोचा बटन बंद करायला विसरले.

माइकच बटन बंद नसल्याने काहींच्या घरी लहान मुलांचे आवाज, टीव्ही सुरू असल्याचा आवाज, भांड्याचा आवाज, कूक्करच्या शिट्टीचा आवाज, घरातल्या पाळीव कुत्र्याचा आवाज चांगल जगभर ऐकू गेल.

तंत्रज्ञानाचा उपयोग करत असतांना त्याला समजून घेणं आवश्यक आहे हे लोकांच्या अजूनही लक्षात आलेल नाही. माइक म्यूट करा अस प्रत्येक वेळेस सांगून सुद्धा काही लोकांच्या खाजगी चर्चा त्यांच्या नकळत प्रसारित होतात. एका अश्याच ट्रेनिंगच्या वेळेस घरात लहान मुलांनी भोंगा इतक्या जोरात वाजवला की पलीकडच्या देशातली ट्रेनिंग देणारी बाई चांगलीच दचकली आणि डोळे विस्फरलेल्या अवस्थेत तिला काय बोलायचं हेच कळेना !!!

आपल्याकडची इंटरनेट सेवा देणार्‍या संस्था अजूनही इतक्या प्रगत नाही आणि त्यामुळे बर्‍याचदा विडियो सुरू असताना आवाजाची घालमेल होतांनाचा वाईट अनुभव मिळतोय. एकाच वेळेस जर खूप जण बोलत असतील तर त्रास होतो. प्रश्न असल्यास चॅट बॉक्सची सोय आहे. अगदी बोलायची गरज असल्यास हात वरच बटन दाबलं तर समोरच्याला कळतं. आणि मग तुम्ही रीतसर अन-म्यूट करून प्रश्न विचारू शकता.

आता काही महविद्यालयांचा उत्साह वाढला आहे. आम्ही सुद्धा वेबिनार आयोजित करू आणि आपल्या सहकार्‍यांना ट्रेनिंग देऊ असा त्याच्या मागचा हेतु. इथे मीटिंग/ स्टाफ ट्रेनिंग सुरू झाल्या की त्यांचे नमस्कार चमत्कार दहा पंधरा मिनीट अजूनही घेतात. समोरचा ट्रेनिंग देणारा बोलणं सुरू करण्या अगोदर माझा आवाज बरोबर येतोयका?’ हा प्रश्न नक्कीच विचारतो. मग सगळे माइक वर  होकार देत बोंबलतात हौजी ...तुमचं बी येतय आणि तुमच्या मागच्या खिडकीत बसलेली मांजरबी दिसते’.

मी अनुभवलेल्या अश्याच एका कॉलेजच्या राष्ट्रीय पातळीच्या वेबिनार कार्यक्रमात अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची ओळख आणि स्वागत समारंभ अगदी प्रत्यक्षात चालतो असा रीतसर अर्धा-पाऊण तास चालला. मग एक सूचना करण्यात आली की आता राष्ट्रगान होईल. आई शप्पथ !!! माइक अन-म्यूट करून  लॅपटॉप समोर उभ राहून राष्ट्रगान पूर्ण म्हंटलं आणि नंतर  भारत माता की जय चा जयघोषही केला. आपल्याला नाही राहवल जात. शाळा असो, सिनेमा हॉल असो, क्रिकेट स्टेडियम असो....राष्ट्रगान झाल की भारतमाता की जय हे व्हायलाच पाहिजे. आजूबाजूच्या लोकांना काहीही वाटूदे…..!!!

हिच्या कॉलेज मधल्या एमए फायनलच्या मुलींचे क्लास्सेस लॉकडाउन मुले राहून गेले. ती नुकसान भरपाई वेबिनारमुळे निघाली. अगदी ऐप लॅपटॉप वर डाऊनलोड करून, क्लास्सेस ची वेळ ठरवणं, पुढे मुलींना लिंक पाठवण्यापासून सर्व जमलं. प्रत्येक  विषयाबद्दल प्रेझेंटेशन बनवायची मेहनत हिनी घेतली. जेवढेही वेबिनारच्या माध्यमातून क्लास्सेस घेतले गेले, मुलींनी आवर्जून उपस्थिती दाखवली आणि त्यांना हे आवडल्याच बोलूनही दाखवलं. या कामामुळे आम्हा दोघांनाही त्यामुळे वेबिनार कस आयोजित करावं हे कळलं.   

गेल्या दोन-अडीच महिन्यात प्रवास आणि पर्यटनचे बर्‍याच ट्रेनिंग वेबिनार मध्ये मी उपस्थित होतो. मला याचा फायदा झाल्याचं तेव्हाच कळेल जेव्हा पर्यटन प्रत्यक्ष सुरू होईल. सध्या ट्रॅवल कंपन्या बंद आहेत. त्यातील बरेच कर्मचारी पगार न घेता सध्या सुटी वर घरीच आहेत.  उपासमारीची वेळ आलीय. पण, जशी संधी मिळेल तस ट्रेनिंग / माहिती ही लोक घेताय.  

अश्याच एका नामांकित ट्रॅवल कंपनीने त्यांच्या सहकार्‍यांचा उत्साह वाढवायला एक लाइफस्टाईल गुरूचा वेबिनार ठेवला. आता या गुरूला स्टेज वर बसून इंटरअॅक्शनची सवय. वेबिनार त्यांच्या करिता नवा अनुभव. चर्चेत लोकांना घेऊन आपण चांगला कार्यक्रम घेऊ शकतो असा समज.  या नादात त्यांनी जिव्हारी लागेल नेमका असाच प्रश्न विचारला सांगा तुमच्या समोर सर्वात मोठ आव्हान काय?’ .याला उत्तर म्हणून कार्यक्रमाच्या चॅट बॉक्स मध्ये काहींनी तुमचं कल्याण होवो लिहिल, काहींनी माइक अन-म्यूट करून त्यांची वाह-वाही केली आणि काही शहाण्यानी चुपचाप मीटिंग लीव केली.

एवढ्यातला माझ्या आठवणीतला सर्वात चांगला संवाद एका आजी-आजोबांचा या  माध्यमातून त्यांच्या परदेशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेले नातवांसोबत होत असताना मी पहिलं. त्यांचे स्क्रीनवरचे गहिवरलेले चेहरे पाहून दाटून कंठ येतो या वसंतरावांच्या गाण्याची मला आठवण आली.

आमच्या चिरागचे वेबिनार क्लास सकाळच्यावेळेसच असतात. क्लास मधली शिस्त इथे घरात नसल्याचं आम्हाला खूपदा दिसलं. मागल्याच रविवारी त्यांच्या सरांनी ऑनलाइन पेरेंट मीटिंग घेऊन होमवर्क बरोबर करतात की नाही हे विचारलं.

आमच्या मित्राच्या घरी त्याच्या मुलाचा ऑनलाइन क्लास सुरू होता. सकाळची पुजा उरकल्यावर आजोबा सहजच काय गम्मत सुरू आहे म्हणून मोठ्या कौतुकाने मागे उभे राहुन ते पाहत होते. नातवानी त्यांच्या लक्षात आणून दिलं की आजोबा कॅमेरा सुरू आहे आणि तुम्ही सोळ नेसून आहात. एक गोष्ट निश्चितपणे सांगता येईल, या क्लास्सेस मुळे घरातल्या मंडळींच्या हालचालींवर अंकुश पडल्या सारखं झालय.

सध्या संगीत कलाकार फेसबूक आणि यूट्यूब वर थेट आपल्या कलेचा आनंद त्यांच्या प्रशंसकांना देत आहेत. काही लेखक आणि साहित्यिक यांचातल्या संवादाचा आस्वाद मला अनुभवता आलाय. फेसबूक आणि यूट्यूब हा एक वेगळा विषय आहे. त्यबद्दलच्या गमती सविस्तर कधीतरी सांगीन.

सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी की गेल्या तीन महिन्यात आम्ही सर्व भाऊ-बहिणी व्हाट्सप्प वर संपर्कात आहोत पण अजुनही कोणाला हे सुचलं नाही की या ऐप चा फायदा घ्यावा आणि कमीतकमी अर्धा तास तरी वरचुअल मीटिंग घ्यावी. आताच हा प्रस्ताव सर्वांसमोर ठेवतो. पाहूया काय म्हणतात ते !!!


अमित नासेरी


Comments

  1. Good.. Real experience but some time this type of gp meeting I get bored...becoz of net issue app problem...

    But something better than nothing...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park