हा आवाज कोणाचा?

हा आवाज कोणाचा?
मे महिन्याची नागपुरातील सकाळ.  अलार्म वाजायच्या आत आलेली जाग. जाग येण्या मागच कारण एक आवाज. गम्मत अशी की हा आवाज खूपच ओळखीचा होता. थोड डोळे चोळुन आवाजाकडे लक्ष दिलं तर... अरेच्च्या... हे  तर  कोंबड्याचं आरवणं !!! इतक्या वर्षात देव नगर, नागपुरात राहत असताना मला हा आवाज कधीच ऐकू नाहीं आला. दर दोन तीन मिनिटाला त्याचं  आरवणं सुरूच होत. बाल्कनीत जाऊन पाहिलं पण तो काही दिसेना. 

समोरच्या दुकानात दूध आणायला गेलो. तेव्हाही आवाज येतच होता. ते दुकानदार सुद्धा आश्चर्य करत होते की आवाज येतोय पण कोंबडा काही दिसत नाहीं. घरी आल्यावर हीनी पण विचारलं की कोंबड्याच्या आवाज ऐकला का? मुलं  अभ्यासाला उठलेली होती. लॉक डाऊन काळात त्यांची शाळा कॉलेज बंद असल्यामुळे  वेबिनार सुरू होते. त्या आवाजामुळे त्यांना किंचितही फरक पडलेला नव्हता. तुम्ही आवाज ऐकत आहात का अस मी विचारल्यावर दोघेही मख्ख चेहरे करून माझ्याकडे पाहायला लागले. 

मी निमुटपणे आपल्या कामाला लागलो आणि दोघे आपापल्या क्लासेस मध्ये गुंतले. आमच्या सौचा पुनश्च  कोंबड्याच्या अजूनही आवाज येतो आहे असा सुर ... मी हो म्हंटल पण तो दिसत नाही असंही सांगितल. पुढे आम्ही आमच्या कामाला लागलो. चहा झाला, सकाळची साफ सफाई झाली,  सर्व करत असताना कानावर आवाज सतत पडतच होता. चांगलाच दीड दोन तासानंतर  तो आवाज शांत झाला. 

मी सहजच माझ्या मित्राला फोनवर ही घटना सांगितली. त्यांनी गमतीत म्हंटले की कोणीतरी तुमच्या देव नगरात 'आत्मनिर्भर ' होणं मनावर घेतलय आणि घरातच कुक्कुटपालन केंद्र सुरू केलंय. ते खरं असेलही आणि नसेलही ... लेकीन आज सुबह की शुरुआत ऐसे कैसे हुई ??

तुम्हा सर्वांना माझी बेचैनी कळली नसेल. बरोबर आहे त्यात  काय ?  

तुम्हाला सांगतो हा आवाज मला माझ्या  लहानपणीच्या काळात घेऊन गेला. 

माझं लहानपण  भिलाईतल. आम्ही सेक्टर ६ मध्ये राहायचो.  सेक्टर ६ मध्ये राहायची तीन मजली संकुल होती. एका संकुलात असे १८ बिऱ्हाड राहायची. अमोरसमोर  एका लाईनीत खूपशी संकुल होती. या दोन संकुलाच्या मध्ये खेळण्यालायक छान जागा होती. अशाच एका संकुलात पहिल्या मजल्यावर आम्ही एका क्वार्टर मध्ये राहायचो आणि आमच्या मजल्यावर सोबत इतर कुटुंबीय होते. तेलगू, पंजाबी, बिहारी, ओडिया, बंगाली छत्तीसगढ व मल्याळी अशी सर्व कुटुंब सलोख्याने राहायची. अस म्हणायला हरकत नाही की भिलाई एक छोटंसं भारतच होतं. इथे आमच्याच वयाची मुलं मुली असल्यामुळे छान ग्रुप जमला होता. खेळणं भांडण सर्व काही व्हायचं. 

आता खास गोष्ट , खालच्या मजल्यावर राहणारे मल्याळी कुटुंब जागेचा फायदा घेत आपल्या घरी कोंबड्या पाळायचे आणि काही तसे काही जणांकडे  पशुधन जसे गाई व म्हशी सुद्धा होत्या. कोंबड्या संकुलाच्या मधल्या जागेत दिवस भर फिरत असायच्या. मला त्याचं निरीक्षण करण्याची भारी आवड आणि अस म्हणायला हरकत नाही की ही  निरीक्षणाची सवय  मला इथेच पडली. कोंबड्या मुळे बऱ्याचदा मल्याळी कुटुंब आणि इतर कुटुंबांमध्ये भांडण व्हायची आणि बाकी लोकांचं मनोरंजन व्हायचं. या प्रत्येक घरातला कोंबड्यांचा ग्रुपचा लीडर एक एक कोंबडा असायचा. या कोंबड्यांच आवाजाचं शक्तिप्रदर्शन सकाळपासूनच सुरू व्हायचं. पाहता पाहता सर्व संकुलात अशी चेन रिअँक्शन सुरू व्हायची.  साधारणपणे खालच्या मजल्यावर क्वार्टर मध्ये दोन तीन मल्याळी कुटुंब राहत असायचेच आणि प्रत्येकजण एक छोट्याश्या कुक्कुट पालन केंद्राचे मालकच होते. बऱ्याचदा दोन्ही तिन्ही कडचे कोंबडे आपसात भांडायचे व त्यामुळे मल्याळी कुटुंब आपसात त्यांच्या भाषेत बाचाबाची करायचे. ही आम्ही पहिल्या मजल्यावर रहण्यार्यांकरिता एक मनोरंजनाची गोष्ट असायची. 

यात अजुन एक भर पडायची जेव्हा ही कुटुंब आपापसात हिंदीत भांडायचे( आम्हाला भांडणाच कारण समजावं म्हणून ). 

काही असो सर्व संकुलांमध्ये ही बिऱ्हाड सोबत गुण्यागोविंदाने व आनंदाने सोबत राहायचे. प्रत्येक घरातील उत्सव आम्हाला पाहायला व अनुभवायला मिळाले. होळीत दिवाळी ख्रिसमस सगळी पर्व आनंदाने साजरी केली. कॉलनीत राहायचे घट्ट संस्कार आम्हाला इथेच मिळाले. 

आता  एक  मजेदार किस्सा ऐका ... वेळ झाल्यावर याच कुटुंबातली एक मल्याळी काकू तिच्या विशिष्ट सप्तम सुरात 'ऊडी बे बे बे बे ' करत  कोंबड्यांना बोलवायची. त्यांनी आवाज देणं आणि संकुलात इथे तिथे पसरलेल्या कोंबड्या व  तिची पिल्लं पक पक  आवाज करत तिच्याजवळ धावत यायच्या. मस्त सीन असायचा. मग त्या काकु सर्वांना घरात नेत. मी त्या काकुचा हा सप्तम सुरातला आवाज अजूनही काढून दाखऊ शकतो.  आईशप्पथ !!!

भिलाई सेक्टर भागात झाडं खूप असल्यामुळे पक्ष्यांना पाहणं आणि त्यांचे आवाज ऐकणं माझा हा एक  छंदच झाला होता. इथे नागपुरात सध्या लॉक डाऊन मुळे सकाळी  पक्ष्यांची आवाज ऐकू येतात पण एक कोकिळच आहे जी सर्वांवर मात करते. माझ्या मुलांना याची आवड नाही आणि मी त्यांच्यात ही आवड निर्माण करू शकलो नाही याची मला खंत वाटते. 

पण एकच दिलासा, त्यांना संगीताची आवड आहे.  मोठा मुलगा यश आणि लहान चिराग यांना संगीत वाद्य  जसे हार्मोनिका, बासरी, तबला, बोंगो, माऊथ ऑर्गन, गिटार छान वाजवता येतात. मला कधी कधी वाटत की आपल्या आजू बाजूच्या वृक्षां वरील पक्ष्यांची दुनिया पाहून आणि त्यांचे आवाज ऐकून त्यांनी प्रेरणा घ्यावी आणि संगीतात अजुन प्रगती करावी.

आज एक कोंबडा आरवला आणि मी नकळत माझ्या लहानपणच्या आठवणींना इथे तुमच्या समोर मांडू शकलो या बद्दल मला बर वाटलं. आता अपेक्षा अशीच आहे की या नंतरही तो कोंबडा आरवेल.... अलार्म वाजण्या अगोदर ... नेहेमिकरिता !!!

अमित नासेरी

Comments

  1. खूप सुंदर लेख. मनापासून आवडलं तुमचं लिखाण!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park