भांडी पडण आणि माझं हसण!!
भांडी
पडण आणि माझं हसण!!
तुम्हा सगळ्यांना हा प्रकार थोडा विचित्र वाटेल पण हा गमतीदार
त्रास मला लहानपापासूनच आहे. आहेना आश्चर्याची गोष्ट? भांडी पडली किँवा पाडलीच तर काय होत? अगदी सोप आहे....त्या
आवाज करतील.....बरोबर? ....कधी कधी खूप आवाज सुद्धा करतील!! संगीतात सात सुर आहेत- सा रे गा म प ध नि....मग भांडी पडलयावर जो आवाज
होतो तो नक्की कोणता सुर असतो? या सात सुरांची
साथ लाभली की छान गाणी तयार होतात असं आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेच. पण भांडी पडल्याचा
सुर माझ्याकरता एक मोठा प्रोब्लेम करेल असे का बरं व्हावे? या आवाजाशी माझं नातं देवांनी माझ्या पत्रिकेत कसं काय जुलवल हे बऱ्याच ज्योतिषांना
ना उलगडलेलं कोड आहे.
मी इथे या भांड्यांची व सात सुरांची जुळवा जुळव करण्याचं कारण काय?
इथे एक गोष्ट मला बिलकुल क्लिअर करायची आहे की मी स्टील च्या
भांडीं बद्दल बोलत आहे.
आपण टिपिकल महाराष्ट्र मध्यमवर्ग कुटुंबात जन्मलो आणि ज्या
काळी जन्माला आलो तो पर्यंत स्टीलच्या भांड्यांची रेल चेल सर्व घरात सुरू झाली होती.
आता मूळ मुद्द्या कडे
वळू. अगदी लहान असताना आई मला अश्या छोट्याश्या स्टीलच्या ताट वाटी मधून जेऊ
घालायची.....एकदा असच जेवण झाल्यावर ती रिकामी वाटी पडली. त्या आवाजाने मी खूप खदखदून
हसायला लागलो अस आई सांगते. तीन मला दारापाशी किवा खिडकीपाशी चिमण्या आल्या की मला
हसताना,खुष होताना पहिल होतच....पण हा प्रकार
तिच्या समजण्यापलीकडे होता.
थोड मोठं झाल्यावर
'घरी भांड्यांचा आवाज करू नये कारण
त्यांनी घरात भांडण होतात अस मला सांगण्यात
आल'. मी सुद्धा निमूटपणे समजून घेतलं. पण कधी
चुकून घरात भांडी पडल्यावर त्याचा आवाज ऐकून हसण्यावर कंट्रोल आपण करू शकत नाहीं हे
मला लक्षात आलं होतच.
सुरूवात बालमंदिर मध्ये असतानाच झाली. सगळे बालगोपाल मधल्या
सुट्टीत घरून आणलेला डबा खायचे.... सगळ्यांचे लहान प्लास्टिकचे डबे असायचे. आमची टीचर
स्टीलचा डबा आणायची. एकदा असाच जेवण झाल्यावर त्यांच्या हातातून डबा निसटून पडला. मग
काय !!! तो सुर , तो डबा, माझ हसणं आणि पुढे टीचर चा मार !! अजुन पुढे ऐका.... माझ्या
डोळ्यातून पाणी आणि त्यात बाकी मुलांच्या चेहऱ्यावरच ' कशी अद्दल घडली' असा भाव हास्य
मी कधीच विसरू शकणार नाहीं.
पुढे शाळेत येईस्तोवर टीचर स्टाफरुम मध्ये खात असल्यामुळे
मला तसा त्रास नाहीं झाला. पण कधी कोणी पाहुणे
घरी येणार असले की मला आई आधी बजावून सांगायची ' घरी किचेन मध्ये काम करत असताना भांडी
पडलीच तर हसण्यावर कंट्रोल कर...चांगली सवय नाही'.
भिलाई ला असताना फॅमिली फ्रेंड्स कडे येणं जाणं होतच. बऱ्याचदा
आई बाबा आणि लहान भाऊ प्रशांत सोबत जाणं व्हायचं. मला ताकीद दिली जायची ' अमित कंट्रोल'. तरी एक दोनदा तारांबळ उडालीच. एकदा असच एका काका
कडे गेलं असताना आत किचन मध्ये ताट पडल. आई बाबांना कळायच्या आत मी घरा बाहेर धूम ठोकली.
त्या काकांना काय वाटलं त्यापेक्षा घरी आल्यावर ' तू कुठंही नेण्या लायकीचा नाहीं
' अस मला ऐकावं लागलं.
पुढे दहावीचं वर्ष असताना पाटणकर सरांकडे गणित शिकायला जायचो.
त्यांचं क्वार्टर लहानच. आम्ही जिथे बसायचो त्याला लागूनच किचन होत. काकू काम करत असताना
खूपदा भांडी पडायची. बाकी पुढे सांगायची गरज नाहीच.
आमच्या घरी १९७७ साला पासून टीव्ही होता. त्यानं रविवारी
सिनेमा असायचा. खूप लोक यायची. अगदी मेळावा भरत असे. पुढे दूदर्शनवरील राष्ट्रीय प्रसारण सुरू झालं. क्रिकेट मॅच चे थेट प्रसारण पाहायला मिळाले. अश्या वेळेस एक भाऊ
आमच्या घरी आले. घरी मी , आई व प्रशांत होतो. बाबा फॅक्टरीत होते. आता मॅच पाहता पाहता
भाऊला लागली झोप. लंच टाईम झाला. आईला प्रश्न पडला की यांना उठवाईच कसं?...मी वा प्रशांत
दुसऱ्या खोलीत विचार करत होतो....अब कैसे? त्यात मला एक आयडिया आली. मी एक स्टीलचा रिकामा ग्लास त्यांच्या बाजूला पडला.
आवाजाने भाऊ खाडकन जागे झाले. मी माझ्या हसण्यावर कंट्रोल ठेऊन धीर गंभीर चेहरा करून
त्यानं सांगितलं की मॅच संपली!! भाऊ बेचारे उठले आणि त्यांच्या घरी निघुन गेले. पण
नंतर मी पाहिल आतल्या खोलीत आई आणि प्रशांत छान हसत बसले होते. पण मी नाहीं हसलो कारण
त्या दिवशी मी माझ्या हसण्यावर खरंच कंट्रोल करू शकतो हे मला कळून चुकलं.
पुढे मी नागपूर मध्ये शिकायला आलो. काकाकडे राहलो. नंतर आई
बाबा आले आणि आम्ही सर्व नागपुरात स्थ्याईक झालो.
इतकी वर्ष झाली, पण भांडी पडल्यावर मला अजूनही हसू येत पण
मी चेहऱ्यावर दाखवत नाहीं. कधी कधी फसकन हसू निघून जात. हा गमतीदार त्रास मी मित्रांसोबत
कधीच बोललो नाहीं. बऱ्याचदा त्यांच्या कडे जेवताना ताटली कीवा पेला पडल्यामुळे मी माझ्या
हसण्यावर किती नियंत्रण ठेवलं हे मलाच माहिती.
हा सुरच मोठा गमतीदार आहे. ३ इडियट सिनेमा मध्ये जावेद जाफरी
जेव्हां त्याच्या हतातल भांड पाहतो आणि ते रिकाम असल्याची जाणीव प्रेक्षकांना बॅक ग्राउंड
मधल्या ' ट्वाइंग 'या गमतीदार आवाजा वरून कळते.
भगवान दादांचं ' अलबेला' मधल्या 'किस्मत की हवा कभी नरम कभी
गरम ' या गाण्याच्या शेवटी नाचता नाचता भांडी पडतात आणि तो आवाज चांगलाच पाच सहा सेकंदा
पर्यंत असतो. तुम्ही फक्त माझ्याकडे पाहाल तर त्या आवाजाला माझ्या इतकं कुणी एन्जॉय करुच शकत नाहीं याची प्रचिती तुम्हाला येईल.
सध्या लॉक डाऊन मध्ये घरी याच स्टीलच्या भांड्यांना धुण्याचा
काम माझ्या कडे आहे. साहजिकच त्या माझ्या हातातून सुध्धा पडतात. मी हसतो सुध्धा पण त्या सुरांशी आता दोस्ती झाली आहे.
तुम्हाला विश्वास नाहीं होणार पण मी आजकाल बिनधास्त हसतो. एक गोष्ट मला कळली आहे की
मी जसा आहे तसाच बरा आहे. हसण्याचा चान्स जेव्हां, जिथे आणि जसा मिळतो तसं हसून घेतो.
माझ्यामुळे दुसऱ्यांना हसू येत असेल तर अजुन छान. कारण मी एक निमित्त झालो त्यांच्या
हसण्या करिता. आता हे गुपित तुम्हाला कळल आहे म्हणून एकच विनंती कृपा करून माझ्या समोर भांडी पाडू नका....काय माहिती
इथे हसण्यावर नियंत्रण नाहीं राहणार..... इसलिये
पहलेही बता दे रहा हूं !!!
अमित नासेरी
Comments
Post a Comment