एक वेगळी वाट !!

 

फेब्रुवारी महिन्यात आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुका आणि कुरखेडा तालुक्यात काही गावांमध्ये जाण्याचा योग आला.

निमित्त होतं - अनबॉक्स!!

अनबॉक्स एक संकल्पना म्हणून, एक चळवळ म्हणून, आपल्या राज्यात आणि सोबतच राष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. यात ३ -१२ वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये कलेचा सदुपयोग करून, त्यांच्यात सकारात्मक जडण-घडण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे. त्याचे दीर्घकालीन परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वात पडताना दिसतात. समीर हेजीब, हर्षवर्धन पाटील, सपना पाटील आणि त्यांची टीम यात मेहनत घेत आहेत. यांचा प्रयत्न नक्कीच वाखाणण्या सारखा आहे.

यांच्या चळवळीची दखल गडचिरोलीतील नामांकित गैरसरकारी संस्था 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी ' यांनी घेतली. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून संस्थेतील कार्यकर्ते आणि अनबॉक्सची टीम कोरची आणि कुरखेडा तालुक्यातील काही निवडक गावांमध्ये तिथल्या लहान आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना राबवत आहेत.

अनबॉक्स एक स्वतंत्र विषय आहे आणि त्याबद्दल मी सविस्तर लिहिणार आहे पण ते नंतर .... तो पर्यन्त त्यांच्याबद्दलची माहिती getunbox.in या संकेतस्थळवरून अवश्य घ्यावी.

मी आता तुम्हाला वेगळ्या वाटेवर फिरायला नेणार आहे.... !!

गोटूल 

नागपूर ते रायपुर या राष्ट्रीय महामार्गावर देवरी पासून कोरची कडे एक रस्ता वळतो. अंदाजे ४५ कि. मि. चा हा रस्ता निसर्गरम्य जंगलातून जाता-जाता कोरची तालुक्याला पोहोचतो. आम्ही फेब्रुवारीत गेलो तेव्हा पळसाची झाडे बहरलेली होती. जांभळाच्या झाडांना नवीन पालवी येत होती.बांबू आणि मोहाची झाडं तर होतीच. तर एकूण रस्ता एकदम मस्त !! पावसाळ्यात हा परिसर नक्कीच उठून दिसत असणार....

आम्ही कोरची तालुका मुख्यालयाच्या अलिकडे साल्हे गावात असलेल्या ग्रामसभा/ प्रशिक्षण केंद्रात थांबलो. केंद्राच्या समोरच झोपडी बांधलेली दिसली ज्यावर 'गोटूल' लिहिलेले होते.जिथे थांबलो तिथूनच थोड्या-थोड्या अंतरावर आदिवासींची घरं होती. मला असेही लक्षात आले कि हे प्रशिक्षण केंद्र एक मध संकलन केंद्र सुद्धा होतं. इथे मधाच संकलन करून, तिच्यावर प्रक्रिया करून पॅकिंग आणि मग विक्री केली जात होती

मध संकलन केंद्र 
आम्ही गावात फिरायला पायी निघालो. तिथेच एका ठिकाणी हँडपंप वर लहान मुलं आंघोळ करतांना दिसली. बाजूला विहिरीत पाणी मुबलकहोतं. पिण्याच्या पाण्याची सोय एका जलकुंभाच्या आणि तिथेच सोलर पॅनलच्या मदतीने मशीन चालवण्याची यंत्रणा दिसली.अश्याच एका हँडपंप समोर गाईला पाणी पिलवण्याच पुण्य काम सपनाच्या हस्ते झालं. गावात फिरतांना घरांच्या मुख्य दारावर तिथे राहण्याऱ्या लोकांची नाव लक्ष वेधून घेत होती. घरं मोठी, पण काही मातीची व काही सीमेंटची, पण सर्वच स्वच्छ आणि कौलारू !! इथे संयुक्त परिवारांच राहणीमान. १२ - ४० जण एक घरात राहतील अशी वेगवेगळी घरं दिसली.

मुख्य दारातून आत गेल्यावर मध्यभागी आंगण आणि त्या अंगणाभोवती सर्वच घरांची रचना. तिथे राहणाऱ्या

प्रत्येक परिवाराला स्वतंत्र खोली. घरात आदिवासी मान्यतेनुसार लाहानश्या खोलीत मंदिर सुद्धा होते. यात शस्त्रे आणि लाकडीचे  घोडे आणि हत्ती ठेवलेले होते. सर्वांचा स्वयंपाक सोबतच होतो. घरात पशुधन म्हणून गाई, बकऱ्या,वराह तर होतेच पण प्रत्येक घरात कुक्कुटपालन सुद्धा दिसले. काही घरात बदक सुद्धा पाळली होती. काही सधन घरात म्हशी सुद्धा दिसल्या. पण महत्त्वाचे, प्रत्येक घराच्या मागे एक छोटीशी वाडी किवा परसबाग होती. त्यात वांगी,मिरच्या, टोमॅटो, केळी, शेवगा व वेलवर्गीय भाज्या दिसल्या. मका इथे आवर्जून लावला जातो. पावसाळ्यात रानभज्या घेण्याच प्रमाण खूप आहे असे महेश लाडे यांनी माहिती दिली. त्यातून खाण्यालायक चविष्ट भाज्या बनवतात असं कळलं.एकूण आदिवासी खाद्य संस्कृतीचा आनंद आपण इथल्या भागात घेऊ शकता.धान ह्या भागातल मुख्य पीक. ज्यांच्या कडे पाण्याची सोय होती त्यांनी उन्हाळी धानाची लागवड केलेली दिसली.

आम्ही गावात फिरताना सर्वच घरातली माणसं शेतावर कामात व्यस्त होती. येतांना गावाच्या वेशीवर काही थडगे दिसली. पण त्यावर घोड्यासारखी लहान मूर्ती पाहून थोडं कुतूहल निर्माण झालं . हे सर्व समाध्या असल्याच कळलं. इथे मृत व्यक्तीला दफन करण्याची पद्धत आहे.

सर्व परिसर अतिशय निसर्गरम्य !! आम्ही संध्याकाळी नेहारपायली गावात गेल्यावर तिथल्या तलावात बदक तरंगत होती. इथलीच

एक मजेदार गोष्ट शेअर करतो. या गावात लहान मुलं बरीच होती. त्यांच्या सोबत महेश  लाडे यांनी काही समूह खेळ खेळले. त्यात आमची शाल्मली सुद्धा सहभागी झाली. या सर्व मुलांना नंतर हर्षवर्धननि त्याच्या कार मधून 'जॉय राइड' चा अनुभव दिला. या गावातून निघताना आकाशात सूर्यास्ताच्या वेळेची रंगबिरंगी छटा निश्चितच पाहण्यासारखी वाटली.

अजुन एक लक्षात येणारी गोष्ट म्हणजे इथे लोक घरं बांधताना त्यात लागणाऱ्या वीटा स्वताच तयार करतात. लोकं मेहनती तर आहेतच आणि वेळोवेळी उत्सवात सुद्धा सहभाग घेतात . इथे वर्षभर काही-ना-काही उत्सव सुरू असतात. खासकरून दिवाळीनंतरचा उत्सव पाहण्यासारखा असतो. कारण त्यावेळेस 'लयोर' नाचाचा आनंद आवर्जून सर्वच घेतात.

एकूणच रात्री ७ -८ पर्यन्त सर्व ठिकाणी शांत होऊन जातं. इथलं वातावरण शुद्ध असल्याने रात्री आकाशात तारे मोजावे तितके कमी. पावसाळ्यात सुरवातीला काजवे दिसण्याच प्रमाण खूप असतं. रात्री मधूनच घुबड आपापसात काहीतरी बोलतांना ऐकू येतात. आज दिवसभर फिरल्याने रात्री छान झोप लागली.



सकाळी मात्र कोंबडे आरवायला लागल्यामुळे जाग आली
. त्यांच आरवण कामालिच वाढत गेलं. बहुधा आपपापल्या घरातल्या कोंबडी मंडळींना इम्प्रेस करत होती असं वाटलं. समीर हेजीब सकाळीच शेतात फिरायले गेले तेव्हाच कळलं. त्यांनी मोराचा आवाज सुद्धा ऐकला असं सांगितलं.

सकाळी आंघोळ करून संस्थेतील शुभम नावाच्या कार्यकर्तेच्या गावात गेलो. गावाच नाव सोहले. त्याच्याकडे पोह्याचा नाश्ता झाला. सोहले गावाच्या जवळच एक नदी वर आम्ही सर्व ट्रेक करत गेलो. तिथे पोहोचल्यावर पाण्यात पाय टाकून बसल्यावर जो आनंद मिळाला तो सर्वांनीच घ्यावा असं वाटलं. तिथूनच परतताना सिंदी च झाड दिसलं आणि बाजूलाच त्याच्यातुन काढलेले द्रव्य विकतांना एक बाई होती. ते द्रव्य प्यायला गोड लागलं. नंतर कळलं कि दुपारनंतर आंबल्यावर त्याची दारू बनते. आदिवासी भागात तुम्हाला सिंदीची झाडे दिसतीलच. इथूनच आम्ही गाहाणेघाट या गावात गेलो. आशीष नावाचा एक कार्यकर्ता इथे राहतो. त्याच्या घरी सुद्धा परसबागेत पपई लागलेली दिसली. शाल्मलीला इथल्या गावात बकरीची पिल्लं कंपनी द्यायला होती हे विशेष!!

पड्यालजोब नावाच्या गावातला अनुभव इथे नमूद करण्यासारखा आहे. इथे ग्रामसभेतून बांबूचा लिलाव करण्यात

येतो. आलेला पैसा गावाच्या विकासात आणि ग्रामस्थांच्या कामात येतो. इथेच गावपातळीवर एक उत्कृष्ट सामूहिक गोटूल ग्रामसभेची उभारणी केलेली आहे जिथे सभा आणि प्रशिक्षण कार्य आयोजित करतात. टीमवर्कचा एक छान उदाहरण इथे पाहायला मिळाल. गावापर्यंत पोहोचणार रस्ता कच्चा होता पण गावाच्या आत रस्ते कमालीचे स्वच्छ दिसले. इथेच एक म्हातारी बाई सिंदीच्या पानापासून चटई तयार करत होती. तिला कमी दिसत असून सुद्धा तिचे हाथ हे बारीक काम करण्यात पटाईत होते.


थोडक्यात गेल्या दिड-दोन दिवसांचा अनुभव माझ्यासाठी आदिवासी ग्रामीण पर्यटनाचा ठरला. शुद्ध वातावरण,

मन-मिळावू लोकं, निसर्गाच्या कुशीत असलेला हा परिसर शहरातील लोकांना 'ऑफ-ग्रिड' अनुभव देण्यासाठी नक्कीच सज्ज आहे. पण थोडंसं काम करावं लागणार. 'आम्ही आमच्या आरोग्यासाठी' संस्थेचे मुख्य संस्थापक डॉ. सतीश गोगुलवार यांच्याशी भेटल्यावर त्यांनी या भागात आदिवासी पर्यटन सुरू करण्याची इच्छा दर्शवली. असं करतांना मूळ आदिवासी संस्कृतीची जपवणूक करून ती लोकांना आनंद देणारी ठरेल अशी त्यांची मनिषा बोलून दाखवली.


या पूर्ण भागात ग्रामीण पर्यटन, कृषि पर्यटन आणि सोबतच आदिवासी पर्यटन याला वाव निश्चितच आहे. पण तशी सेवा देणारी मजबूत यंत्रणा उभारण्यासाठी तिथल्याच परिसरातील युवा आणि इतर उत्सुक कार्यकर्ते लागणार. त्यांना तसे प्रशिक्षण पण लागेल. एक शाश्वत प्रकल्पाची सुरुवात होईल एवढं नक्की.


अमित नासेरी

९४२२१४५१९०

Comments

  1. Khoobch chaan.Next time muze saath le Jana mat bhulna

    ReplyDelete
  2. भास्कर परातेSeptember 17, 2023 at 5:02 AM

    वाह! अप्रतिम लेख. वाचून मजा आली.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मनात दरवळणारा ‘औरा पार्क’ !!!

निर्मल आनंद चाहिये ??.. .. ‘औरा पार्क’ आईये !!!

Pure -> Divine ->Holy - > Aura Park